पुणे, सोलापूर, परभणीसह कोकणात तुफान पावसाला सुरुवात; मुंबई, ठाण्यात रिमझिम सरी
मुंबई : मुंबई, ठाणेसह राज्यात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. दादरमध्ये रिमझिम पाऊस सुरू आहे, पूर्व उपनगरात पावसाला सुरुवात झाली आहे. दिवसभराच्या ब्रेकनंतर पुण्यात पुन्हा संध्याकाळी मुसळधार पावसाला सुरुवात झाला आहे. डेक्कन, घोले रोड, लॉ कॉलेज रोड, एसबी रोड परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने 11 जूनपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मेघगर्जनेसह जोरदार पावसाची हजेरी
वाशिम जिल्ह्यात पुन्हा आज चौथ्या दिवशीला जिल्ह्यात अनेक भागात मेघगर्जनेसह विजेच्या कडकडाट जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे. मालेगाव, वाशिम, मंगरूळपीर ,आणि रिसोड, या भागात पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाला आहे.आता ज्या भागात चांगला पाऊस बरसला त्या भागात पेरणीला वेग येणार असल्याचे चित्र आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाचा जोर
धाराशिवमध्येही मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अर्ध्या तासापासून धाराशिव आणि परिसरात मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. धाराशिव शहरातील फकीरानगर, गणेश नगर, समर्थ नगर, वैराग नाका परिसरात गटारांना नदीचं स्वरूप आलं आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाचा जोर पाहायला मिळत असल्याने धाराशिव मधील शेतकऱ्याच्या पेरणीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पावसाचे आगमन झाल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पहिल्याच पावसात ठिकठिकाणी पाणी साचलं
धाराशिव परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने पहिल्याच पावसात शहरातील फकीरा नगर भागातील अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने घरातील जीवनावश्यक वस्तू पाण्यात बुडाल्याने नागरिकांचे मोठं नुकसान झाला आहे. घरातील ज्वारी भरून ठेवलेली पोती पाण्यात भिजल्याने ज्वारी आणि धान्याचे मोठं नुकसान झालं आहे. आपल्या घरातील पाणी बादलीने उपसून बाहेर काढण्याचा केविलवाणा प्रयत्न लोक करत आहेत. या भागातील गटारी तुडुंब भरून रोडवर पाणी जमा झाल्याने हेच पाणी लोकांच्या घरांमध्ये घुसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
अंतरवाली सराटीसह परिसरात पावसाची जोरदार हजेरी
जालना येथे अंतरवाली सराटीसह परिसरात दुपारी जोरदार पाऊस बरसला. मृगाच्या धारांनी उकाड्याने हैराण नागरिकांना या पावसाने चांगला दिलासा मिळाला असून परिसरात या मोसमातील पहिला जोरदार पाऊस झाला. दरम्यान पेरणीसाठी शेतकऱ्यांची रान तयार असून आणखी दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.
अधिक पाहा..