बार्शी-धाराशिव मार्गावर एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात; तिघांनी जागीच गमावले प्राण
Solapur Barshi News Updates: सोलापूर : बार्शी-धाराशिव मार्गांवरील तांदुळवाडी काल (गुरुवारी) एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील तीन तरुणांचा मृत्यू झाला असून तिनही तरुण गाडी खाली चिरडून जागीच ठार झाले आहेत.
बार्शी-धाराशिव मार्गांवरील तांदुळवाडी येथे झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. काल संध्याकाळच्या सुमारास एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील तीन तरुण गाडी खाली चिरडून ठार झाले. कार्तिक यादव, ओंकार पवार, ओम आतकरे अशी तीन तरुणांची नावं आहेत. हे तिघेही धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी होते. हे तिघे मित्र धाराशिवहून बार्शीकडे निघाले होते. यावेळी पुण्याहून धाराशिवकडे निघालेली एसटी बस आणि दुचाकीचा तांदुळवाडी येथे भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील तिनही तरुण एसटी बस खाली अडकले. एका तरुणाचं शीर हे शरीरापासून वेगळं झालं. तर इतर दोघे जवळपास 50 फूटांपर्यंत फरफटत गेले. घटनेची माहिती मिळताच तांदुळवाडीतील ग्रामस्थ मदतीला धावून आले. त्यांनी बसमधील काही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत.