भाजपने नगरमधून सुजय विखेंना लोकसभेची उमेदवारी देताच हालचालींना वेग, निलेश लंके उद्याच शरद पवार गटात प्रवेश करणार?
मुंबई: भाजपकडून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे-पाटील यांनी पुन्हा एकदा लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. मंगळवारी संध्याकाळी भाजपची उमेदवार यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर विरोधकांच्या गोटात हालचाली सुरु झाल्या आहेत. कारण, सुजय विखेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लगेचच अजितदादा गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या पक्षांतराची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, निलेश लंके हे गुरुवारी म्हणजे उद्याच शरद पवार गटात (Sharad Pawar Camp) प्रवेश करतील. महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार म्हणून निलेश लंके सुजय विखेंच्या (Sujay Vikhe Patil) विरोधात निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत निलेश लंके यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा संपन्न होईल. दोन दिवसांपूर्वीच निलेश लंके यांच्या शरद पवार गटातील प्रवेशाची चर्चा रंगली होती. मात्र, काही तासांमध्येच शरद पवार यांनीच आपल्याला निलेश लंके यांच्याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे ही चर्चा हवेतच विरली होती. त्यामुळे आता गुरुवारी निलेश लंके खरोखरच शरद पवार गटात प्रवेश करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
पुण्यातील शरद पवार यांच्या निवासस्थानी सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद होणार आहे. याच पत्रकार परिषदेत निलेश लंके आपली भूमिका स्पष्ट करून विखेंविरोधात लढाईचं रणशिंग फुंकतील, असे सांगितले जात आहे. तसे घडल्यास निलेश लंके हे अजितदादा गटाकडून शरद पवार गटात परतणारे पहिले आमदार असतील.
काही दिवसांपूर्वीच निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना जाहीरपणे आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली होती. लोकनेते, फार वेळ घालवू नका. आमच्या पक्षात या आणि दक्षिण नगरमध्ये स्वाभिमानाची तुतारी वाजवा, असे आवाहन अमोल कोल्हे यांनी केले होते. त्यानंतर सोमवारी पुण्यातील शासकीय विश्रामगृहात निलेश लंके आणि अमोल कोल्हे यांची भेट झाली होती. या बंद दाराआड झालेल्या चर्चेचा नेमका तपशील समोर आला नव्हता.
शरद पवार निलेश लंकेंच्या पक्षप्रवेशाबाबत काय म्हणाले होते?
निलेश लंके तुमच्या पक्षात घरवापसी करणार आहेत, ते तुमच्या संपर्कात आहेत का, असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला होता. त्यावर पवारांनी म्हटले की, या सगळ्या चर्चेला काही अर्थ नाही. निलेश लंके यांना पुन्हा आमच्या पक्षात घेण्याची चर्चा एकदम कशी काय सुरु झाली? आमच्या पक्षात येण्यासाठी निलेश लंके यांच्यासारखे अनेक लोक इच्छूक आहेत. मग त्यांना विचारलं नसतं का? निलेश लंके यांचा आज आमच्याकडे पक्षप्रवेश आहे, हे मलाच माहिती नाही. मी तुमच्याकडूनच ही गोष्ट ऐकतोय, असे शरद पवार यांनी सांगितले होते.
आणखी वाचा
निलेश लंके यांची ‘घरवापसी’ का? अजित पवारांची साथ सोडून ‘तुतारी’ची वाट का? ‘ही’ आहेत प्रमुख कारणं
अधिक पाहा..