मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केलेली पुण्यातील घटना कोणती, 2 महिन्यात आरोपीला फाशी?; मिलिंद देवरांनी सांगितली स्टोरी

मुंबई : बदलापूरच्या बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनेवरुन राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यावरुन, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचंही पाहायला मिळत आहे. कारण, विरोधकांकडून या घटनेचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप सत्ताधारी करत आहेत, तर राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिली नाही, लाडकी बहीण योजना नको तर सुरक्षीत बहीण योजनेची महाराष्ट्राला गरज असल्याचं विरोधक म्हणत आहेत. मात्र, सरकार आरोपीला कायद्यानुसार कडक शासन करेल, बदलापूर प्रकरणातही योग्य ती कारवाई सुरू असून विशेष एसआयटी नेमण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे. त्यातच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात एका खटल्याचा संदर्भ देत, 2 वर्षात आरोपीला फाशीची शिक्षा झाल्याचं म्हटलं होतं. आता, त्या घटनेवरुन विरोधकांनी सरकारला प्रश्न विचारले असून सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. 

काँग्रेसमधून शिवसेनेत (Shivsena) दाखल झालेले खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री शिंदेंनी Eknath Shinde) उल्लेख केलेल्या घटनेचा संपूर्ण तपशीलच सादर केला आहे. तसेच, ही घटना नेमकं कधी घडली, त्यात कधी चार्जशीट दाखल झालं आणि न्यायालयात (Court) कधी शिक्षा सुनावण्यात आली, याची इतंभू माहिती दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाषणात उल्लेख केलेली घटना ही 2 ऑगस्ट 2022 रोजीची असून मावळ येथील बलात्कार आणि खुनाच्या गुन्ह्याचा हा विषय आहे. याप्रकरणी, मावळ पोलिसांनी एफआयआर दाखल करुन जलद गतीने तपास केला होता. 

पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावातील साडेसहा वर्षांच्या बालिकेचे अपहरण, तसेच लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना 2 ऑगस्ट 2022 रोजी घडली होती. याप्रकरणी, आरोपी तरुणाला पुण्यातील विशेष न्यायालयाने शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावली. तपासामध्ये आरोपी तेजस दळवीच्या आईचा सुद्धा या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे समोर आले होते. मुलांने केलेल्या कृत्यानंतर गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्यासाठी आईनेच मदत केल्याचे तपासामध्ये समोर आले होते.त्यामुळे तिला सुद्धा सात वर्षांच्या कारावासात शिक्षा सुनावण्यात आली होती. 23 मार्च 2024 रोजी याप्रकरणात पुण्यातील न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. खासदार मिलिंद देवरा यांनी याच घटनेचा उल्लेख करत मुख्यमंत्र्‍यांनी आपल्या भाषणात सांगितलेल्या घटनेत 2 वर्षांच्या आत आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याचं म्हटलं आहे. 

दरम्यान, याप्रकरणात गुन्हा 2 ऑगस्ट 2022 रोजी घडली असून गुन्हा देखील त्याच दिवशी दाखल झाला आहे. आरोपी 3 ऑगस्टला अटक केला, तर पोलिसांनी 12 सप्टेंबर 2022 रोजी आरोपपत्र दाखल केले. 40 दिवसांत तपास पूर्ण करण्यात आला होता. चार्जशीट दाखल केल्यानंतर 6 महिन्यात चार्ज फ्रेम करण्यात आलं. 16 मार्च 2023 रोजी चार्जशीट फ्रेम केलं तर 12 मे 2023 रोजी पुरावे कोर्टात सादर केले. त्यानंतर, 22 मार्च 2024 रोजी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. याप्रकरणात चार्जशीट दाखल केल्यानंतर 15 महिन्यात आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मुख्यमंत्री शिंदेंनी कालच्या भाषणात उल्लेख केलली घटना हीच असल्याचं खासदार मिलिंद देवरा यांनी ट्विटरवरुन सांगितलं आहे. तसेच, बदलापूर प्रकरणातही मुख्यमंत्री स्वत: लक्ष देऊन आहेत, असेही देवरा यांनी म्हटलं आहे.  दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी 2 महिने असा उल्लेख केला, पण 2 वर्षाच्या आता इथं आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

हेही वाचा

Pune Crime : चिमुरडीवर अत्याचार करत खून करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा; आईलाही 7 वर्षांचा कारावास  

अधिक पाहा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *