Nana Patole on Prakash Ambedkar : आपला गैरसमज दूर झाला असावा; आता नाना पेटोलेकंडून प्रकाश आंबेडकरांना पत्र लिहून खुलासा!

मुंबई : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील महाविकास आघाडीची बैठक आज मुंबईत ट्रायडेंट हॉटेलमध्ये पार पडली. मात्र, या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांना बैठकीचे निमंत्रण दिल्यानंतर त्यांनी जाहीरपणे नाना पटोले यांची केलेली खरडपट्टी चर्चेचा विषय ठरला. इतकेच नव्हे तर प्रकाश आंबेडकर यांच्या पत्रानंतर प्रदेशकाँग्रेसमध्ये नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष असतानाही त्यांचे अधिकार कमी झाल्याचे समोर आले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. 

नाना पटोलेंकडील अधिकार काढले 

राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांना फोन केल्यानंतर त्यांनी त्यांच्या समस्या मांडल्या. तेव्हा जयंत पाटील यांनी AICC चे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनाही कॉलवर घेतले. यावेळी रमेश चिन्नाथला आणि जयंत पाटील या दोघांनीही नाना पटोले यांना महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार नाही, हे मान्य केले. महाराष्ट्रासाठी निर्णय घेण्याचे अधिकार बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांना देण्यात आल्याचेही स्पष्ट झाले. 

आता नाना पटोलेंकडून खुलासा

आंबेडकर यांनी लिहिलेल्या पत्रानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना पत्र लिहून खुलासा केला आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केलेल्या विधानांचा विपर्यास झाल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे. पक्षाची भूमिका आहे तीच भूमिका त्यांची आहे.त्यांनी वंचितचा समावेश करून घेण्याबाबत कोणतेही प्रतिकुल मत व्यक्त केलेलं नाही.  रमेश चेन्नीथला यांनी आपल्याशी दुरध्वनी करून चर्चा केल्याने आपला गैरसमज दूर झाला असावा, असा आम्हाला विश्वास असल्याचे म्हटले आहे. या पत्रावर नाना पटोले, जयंत पाटील आणि संजय राऊत यांची सही आहे. 30 जानेवारी होणाऱ्या बैठकीसाठी आपण वेळ राखून ठेवावी, असेही त्यांनी म्हटले आहे. 

दुसरीकडे, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या निवडणूक आघाडीच्या चर्चेतून काँग्रेसने नाना पटोलेंना बाजूला केल्याची विश्वसनीय सूत्रानी माहिती दिली आहे. वंचित आणि प्रकाश आंबेडकरांची नाराजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना भोवली आहे. 

काय म्हटले होते प्रकाश आंबेडकरांनी? 

नाना पटोले यांना लिहिलेल्या पत्रात आंबेडकर यांनी खोचक शब्दात भाष्य करताना म्हणाले होते की, असं वाटतंय की तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेसोबत खेळ खेळत आहात किंवा तुमच्या डोक्यात लोचा झाला आहे. एकीकडे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी श्री. रमेश चेन्नीथाला यांनी मंगळवार 23 जानेवारी रोजी काँग्रेस भवन पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्टपणे म्हटले की निवडणुका जाहीर झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामील करण्यात येईल, जिथे तुम्ही बाजूलाच बसला होतात.

तुमच्या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या इतर दोन जणांनी त्यांच्यासोबत झालेल्या बैठकांमध्ये अगदी स्पष्टपणे मला सांगितले आहे की काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्रातील युतीसंदर्भात कोणतेही निर्णय घेण्याचे अधिकार तुम्हाला दिलेले नाहीत. शिवसेनेसोबत झालेल्या बैठकांमध्ये मला सांगण्यात आले आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व संभाषण राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबतच करतात आणि त्या चर्चांमध्ये तुम्हाला सहभागी केले जात नाही, कारण महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीच्या युतिसंदर्भात निर्णय घेण्याचे कोणतेही अधिकार तुम्हाला देण्यात आलेले नाहीत.

AICC किंवा काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्रात युतिसंदर्भात निर्णय घेण्याची परवानगी तुम्हाला दिली आहे का? काल औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की वंचित बहुजन आघडीला महाविकास आघाडीकडून निमंत्रण द्यायचे असेल तर त्यावर तिन्ही घटक पक्षांचे अध्यक्ष, म्हणजेच उद्धव ठाकरे, शरद पवार व मल्लिकार्जुन खरगे यांची सही असायला हवी. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या अध्यक्षांच्या सहिनिशी सन्मानपूर्वक निमंत्रण द्या. किंवा रमेश चेन्नीथला, राहुल गांधी, श्रीमती सोनिया गांधी अथवा मल्लिकार्जुन खरगे यापैकी कोणी वंचित बहुजन आघाडीला बैठकीसाठी बोलावल्यास कोणताही संकोच न ठेवता आम्ही त्यात सहभागी होऊ.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *