Shahapur : शहापुरात आश्रम शाळेतील 109 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर
Thane Shahapur News : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या भातसई येथील संत गाडगेबाबा आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली असून एकूण 109 विद्यार्थीना विषबाधा झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून प्रशासन आदिवासी मुला मुलींना शिक्षित करण्याचं काम या आश्रमशाळेद्वारे करत असतो परंतु या आश्रम शाळेत बाहेरून अन्न देउन मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल असे कृत्य करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार शहापूर तालुक्यात भातसई परीसरात अनुदानित संत गाडगेबाबा आश्रम शाळा असून या शाळेत परिसरातील आदिवासी विदयार्थी शिक्षण घेत आहे. त्यातच या आश्रम शाळेत वाशिंद भागात राहणाऱ्या विकी चव्हाण यांच्या घरी वर्ष श्राद्ध असल्याने त्यांनी या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दुपारचे भोजन म्हणून गुलाबजाम आणि पुलाव हे अन्न पदार्थ दिले होते.
या आश्रम शाळेत विद्यार्थ्यांची पट संख्या 270 विद्यार्थी असून शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांनी दुपारच्या जेवणात गुलाबजाम आणि पुलाव खाल्ला. त्यामधून त्यांना विष बाधा झाल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली. सुरुवातीला 20 ते 25 विद्यार्थ्यांना अचानक उलटी, जुलाब , मळमळ असा त्रास होत आल्याने या विद्यार्थ्यांना तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून 10 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभाग उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांना उलटी आणि पोट दुखी त्रास जाणवत असल्याने या आश्रम शाळेतील एकूण 46 मुलं आणि 63 मुली अशा एकूण 109 विद्यार्थ्यांना उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे त्यापैकी आठ ते दहा विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असून इतर सर्व विद्यार्थी प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे अधिकारी यांनी माहिती देताना सांगितले की आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी दुपारचे जेवण केल्यानंतर त्यांच्या पोटामध्ये दुखणं आणि उलटे होणं अशा प्रकारची तक्रार केल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. परंतु काही मुलं घाबरून गेल्याने त्यांना देखील त्रास जाणवायला लागला. त्यामुळे एकूण 109 मुला-मुलींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असून फक्त सहा ते सात मुला-मुलींवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आश्रम शाळेत बाहेरून जेवण देण्यासाठी कोणतीही परवानगी नव्हती परंतु काही दानशूर लोक मुला मुलींना जेवण अथवा गोड पदार्थ देत असतात. त्यामुळे या संपूर्ण घटनेची चौकशी करण्यात येईल अशी माहिती प्रकल्प अधिकारी राजेंद्र कुमार यांनी दिली आहे.
अधिक पाहा..