कामगारांच्या पगारवाढीसाठी ठाकरेंच्या पाठपुराव्याला यश! मुख्यमंत्र्यांनी दुप्पट पगार केल्याचा दावा, ठाकरे गटाने थेट प्रसिद्धीपत्रकच काढलं
मुंबई : मुंबई विमानतळातील सहार कार्गो, ओमेगा इंटरप्राईजेस कंपनीमधील इम्पोर्ट एक्सपोर्ट विभागातील कामगारांच्या पगारात वाढ भारतीय कामगार सेनेच्या पाठपुरावामुळेच, भारतीय कामगार सेनेकडून प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. 1200 पेक्षा अधिक कर्मचारी हे भारतीय कामगार सेने सोबतच असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे. विमानतळ नागरी कर्मचारी संघटनेमध्ये एकूण 1600 कर्मचारी असून हे शिवसेना ठाकरे गटाच्या भारतीय कामगार सेनेसोबत असल्याचा दावा भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांनी केला आहे.
कामगारांच्या पगारवाढीसाठी ठाकरे गटाच्या पाठपुराव्याला यश!
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सहार कार्गो, मुंबई येथील ओमेगा इंटरप्राईजेस कंपनीमधील इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट विभागातील कामगारांचा एप्रिल 2024 ते मार्च 2027 या तीन वर्षाकरिता रुपये 5800 पगार वाढीचा करार करण्यात आला. याव्यतिरिक्त 18 पी एल देण्यात आल्या, तसेच डीए ओपन ठेवला आहे. त्यासोबतच कामगारांसाठी पाच लाखांचा वैयक्तिक विमा तसेच दहा लाखांचा अपघात विम्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
ठाकरे गटाने थेट प्रसिद्धीपत्रकच काढलं
सध्याच्या वाढत्या महागाईने त्रस्त झालेल्या कामगारांना या पगारवाढीमुळे आणि करारामुळे विश्वासाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचं भारतीय कामगार संघटनेकडून सांगण्यात आलं आहे. ही पगारवाढ उद्धव ठाकरे आणि अरविंद सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे झालं असल्याचं ठाकरे गटाकडून सांगण्यात येत आहे. त्यांनी तसं प्रसिद्धीपत्रकही जारी केलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी दुप्पट पगार केल्याचा शिंदे गटाचा दावा
दरम्यान, कामगारांना पगारवाढ दिल्याचं श्रेय शिंदे गटाकडून घेतलं जात असताना ठाकरे गटाने याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करत हा करार उद्धव ठाकरे आणि अरविंद सावंत यांच्या पाठपुराव्यामुळेच पूर्ण झाल्याचं म्हटलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात हालचालींना वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीत मविआला मिळालेल्या यशामुळे महायुतीचं टेन्शन वाढल्याचं चित्र आहे. मुंबईतील मतदारसंघात ठाकरे गटाने एकतर्फी बाजी मारली यामुळे ठाकरे गटाचे वर्चस्व असलेली विमानतळ नागरी संघटना शिंदे गट आपल्या ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात असल्याचं बोललं जात आहे. यासाठी त्यांनी संघटनेतील कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली असल्याचं सांगितलं जात होतं. पण, हा निर्णय ठाकरे गटाच्या पाठपुराव्यामुळे झाला असल्याचं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
अधिक पाहा..