पुण्याच्या रुपाली ठोंबरेंना शिवसेनेची ऑफर; अंधारेंच्या ट्विटला दिलं उत्तर, सांगितली पुढील दिशा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे (Rupali Thombare) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगली होती. पक्षात योग्य संधी मिळत नसल्याने त्यांची नाराजी सध्या चर्चेचा विषय बनली.  त्यातच, शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त त्यांनी शुभेच्छा दिल्यामुळे त्या राष्ट्रवादीला सोडून शिवसेनेत (Shivsena) जातात की काय, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला. तर, दुसरीकडे सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनीही रुपाली ठोंबरेंसाठी खास ट्विट करुन एकप्रकारे ऑफरच दिली होती. त्यामुळे, ठोंबरेंच्या भूमिकेकडे अनेकांचे लक्ष लागले होते. आता, स्वत: रुपाली ठोंबरे यांनी माध्यमांसमोर येऊन भूमिका स्पष्ट केली. 

रुपाली ठोंबरे या अस्वस्थ आहेत, कारण एकाच पक्षात एकाच व्यक्तीला सगळी पदं मिळत असतील, प्रवक्ता असेल, स्टार प्रचारक असेल, प्रदेशाध्यक्षपद, आयोग असेल. मग, काम करणाऱ्याचं काय?. त्यामुळे, रुपाली ठोंबरे प्रचंड अस्वस्थ आहेत, असे सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं. तसेच, अप्रत्यक्षपणे त्यांनी रुपाली चाकणकर यांच्यावरही निशाणा साधला. तसेच, ट्विट करुन एकप्रकारे ऑफरच दिली होती. ”निष्कलंक चारित्र्य, उत्तम जनसंपर्क, निडरता, रोखठोक, नेत्यांच्या मागेपुढे करून नाही तर लोकांमध्ये मिसळून काम करणारी लढाऊ कार्यकर्ता. तरीही अजून किती दिवस उपेक्षित राहणार? रूपालीताई, अजून किती मुस्कटदाबी सहन करणार? निर्णय घेण्याची हीच ती योग्य वेळ, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटलं होतं. आता, सुषमा अंधारेंच्या ऑफरवर रुपाली ठोंबरे यांनी स्पष्टीकरण देत मी राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं म्हटलं.   

अजित दादांच्या राष्ट्रवादीतच राहणार

मी अजित दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. सुषमा ताईंची मी आभारी, त्यांनी दिलेल्या ऑफरबद्दल मी आभारी आहे. राजकारणात एका महिलेने, दुसऱ्या महिलेला म्हणजेच काम करणाऱ्या महिलेला ही जी ऑफर दिलीय, त्याबद्दल मी सुषमाताईंची आभारी आहे. पण, मी अजित दादांसोबत आहे, मला अजित दादांच्या नेतृत्वावर किंवा ते मला काय देतील हा मला विश्वास आहे, असे म्हणत रुपाली पाटील ठोंबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. 

दोनवेळा संधीची इच्छा व्यक्त

दरम्यान, रुपाली चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढच्या महिला प्रदेशाध्यक्ष कोण असणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. त्यातच, मनसेमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या रूपाली पाटील ठोंबरे यांनीा संधी मिळेल, अशीही चर्चा होती. मात्र, राष्ट्रवादीकडून अद्याप त्यांना कुठलीही संधी देण्यात आली नाही. विशेष म्हणजे संधी मिळाली तर चांगलं काम करुन दाखवेन, असे त्यांनी म्हटले होते. तर, यापूर्वी विधानसभेसाठी पोटनिवडणुकीसाठीही इच्छा व्यक्त केली होती. 

अधिक पाहा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *