Ajit Pawar: ‘शरद पवार-अजित दादांनी एकत्र यावं, दादांकडे तशी मागणी…’; अतुल बेनकेच्या सुरात दादांच्या आणखी एका आमदाराने मिसळले सूर
पुणे: राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांमध्ये दोन मोठे पक्ष फुटले. मात्र त्याचे पडसाद अद्याप उमटताना दिसत आहेत. पक्षफुटीनंतर आणि नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते मोठी विधाने करताना दिसत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेतली. भेटीनंतर अतुल बेनके यांनी अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) हे एकत्र येऊ शकतात असं वक्तव्य केलं. त्यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. अशातच पुण्यातील जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या सुरात आता अजित पवार गटातील पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेंनी सूर मिसळले आहेत.
राजकारणात कधी आणि काहीही होऊ शकतं असं अतुल बेनके यांनी म्हटलं होतं.त्यानंतर आता पवार साहेब आणि अजित दादा एकत्र आले तर मला आनंद होईल. मी दादांकडे तशी मागणी ही करणार, असं अजित पवार (Ajit Pawar) गटातील पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर मावळचे आमदार सुनील शेळके यांनीही अतुल बेनके यांच्या विधानचं समर्थन केलं आहे.
शरद पवार अजित पवार एकत्रित येण्यावर काय म्हणाले अतुल बेनके?
विधानसभा निवडणुकीला अजून दीड दोन महिन्याचा कालावधी आहे. भेटीत मला साहेब काही बोलले नाही. मीही काही बोललो नाही. त्यामुळे कुठे जाण्याचा प्रश्नच नाही. राजकारणात अनेक स्थित्यंतरं घडली आहेत. अजूनही घडू शकतात हे नाकारू शकत नाही. यदाकदाचित अजितदादा (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) एकत्र येतील हे सांगता येत नाही, असं अतुल बेनके म्हणाले.
शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यावं, अजित दादांच्या समर्थकांनी घातली साद
राज्यातील विधानसभा निवडणुकीपुर्वी शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) एकत्र यावेत. अशी साद आता अजित पवारांचे पिंपरी चिंचवडमधील समर्थक घालत आहेत. जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी सर्वात आधी हे सूतोवाच दिले आणि एकच खळबळ उडाली. त्यानंतर साहेब आणि दादांनी एकत्र यावं, या मागणीला आणखी जोर चढू लागला आहे. दोन्ही नेते एकत्र आले तर आम्हाला आंनद होईल त्यांची ताकद आणखी वाढेल असंही कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. दोन्ही नेते पुन्हा एकत्रित आले तर राज्याचं चित्र नक्की बदलेल असंही कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचं म्हणणं आहे.
अजित पवार आज पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर
शरद पवारांनी (Sharad Pawar) बालेकिल्ल्यात धक्का दिल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे. काल(शनिवारी) शरद पवारांची सभा झाल्यावर आज अजित पवार याठिकाणी मेळावा घेत आहेत. तत्पूर्वी माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्याशी ते व्यक्तिगत संवाद साधणार आहेत. शहराध्यक्ष अजित गव्हाणेंनी तुतारी फुंकल्यावर अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये सक्रिय झाले आहेत. शरद पवारांनी आपल्या शिलेदारांना आपल्याकडे खेचू नये म्हणून अजित पवार अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. ते या ठिकाणी बैठका आणि मेळावा घेताना दिसत आहेत. अजित गव्हाणेंच्या जागी नव्या शहराध्यक्षांची नियुक्ती ही आज होण्याची शक्यता आहे.
अजित पवारांच्या बैठकस्थळी मोठा गोंधळ, भेटण्यासाठी एकच झुंबड, पोलिसांना हस्तक्षेप करण्याची वेळ
अजित पवारांच्या बैठकीच्या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला आहे. माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि समस्या घेऊन आणलेल्या नागरिकांची भेटण्यासाठी झुंबड उडालेली आहे. ही झुंबड हटविण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करण्याची वेळ आलेली आहे.
VIDEO – विधानसभेआधी शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र याव, समर्थकांची मागणी, पाहा व्हिडिओ
[embedded content]
अधिक पाहा..