Maharashtra Politics : लोकसभेला शिंदे गटात, आता विधानसभेला शरद पवारांची तुतारी घेतली हातात; मतदारसंघात घरोघरी जाऊन शपथपत्र वाटली
Maharashtra Political Updates : सोलापूर : गेल्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेतून (Shiv Sena) शरद पवार गटात (Sharad Pawar Group) प्रवेश केलेल्या संजय बाबा कोकाटे (Sanjay Baba Kokate) यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. मी आमदार झाल्यावर हे करिन आणि हे करणार नाही, असा मजकूर असलेली दीड लाख शपथपत्र मतदारसंघात वाटून त्यांनी अनोख्या पद्धतीनं प्रचाराला सुरुवात केली आहे. एकदा आमदार झालं की, काय करणार याबरोबर काय करणार नाही? याचं शपथपत्र देणारा मी पहिला इच्छुक उमेदवार आहे.
मी आमदार झाल्यावर काय करणार? याची भरभरून आश्वासनं उमेदवार देत असतात. मात्र, मी आमदार झाल्यावर काय करणार नाही? याची भलीमोठी यादीच संजय कोकाटे यांनी शपथपत्रातून दिली आहे. यात मी स्वतःच्या प्रपंचासाठी आमदारकीचा उपयोग करणार नाही, मी किंवा माझे नातेवाईक ठेकेदारीचा व्यवसाय करणार नाहीत, भ्रष्ट अधिकाऱ्यांना मतदारसंघात येऊ देणार नाही, मी कोणतीही संस्था, कारखाने किंवा जनतेच्या जीवावर कोणताही व्यवसाय करणार नाही, माझ्यानंतर कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला राजकारणातील किंवा सत्तेतील पद देणार नाही अथवा निवडणुकीलाही उभे करणार नाही, अशा पद्धतीचं शपथपत्र संजय कोकाटे यांनी मतदारांपर्यंत पोहोचवलं आहे.
गेल्यावेळी माढा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेकडून संजय बाबा कोकाटे यांनी निवडणूक लढविली होती. यावेळी त्यांना तत्कालीन राष्ट्रवादी आमदार बबनदादा शिंदे यांच्या विरोधात 76 हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली होती. यानंतर शिवसेनेत फूट पडल्यावर कोकाटे हे शिंदे सेनेसोबत राहिले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुतीत सामील झाल्यावर कोकाटे यांचे कट्टर विरोधक आमदार बबनदादा शिंदे हेही महायुतीत आल्याने लोकसभा निवडणुकीपूर्वी कोकाटे यांनी शिंदेसेनेला सोडचिट्ठी देत शरद पवार गटात प्रवेश केला होता.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभेमध्ये महायुतीच्या विरोधात जोरदार प्रचार करीत माढा विधानसभा मतदारसंघातून 52515 मतांचं मताधिक्य देऊन धैर्यशील मोहिते पाटील यांना विजयी केलं होतं. माढा विधानसभा मतदारसंघावर संजय कोकाटे यांचा दावा असून त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन शपथपत्रातून आपलं म्हणणं मतदारांपर्यंत पोचवल्याचं सांगितलं आहे. संजय कोकाटे महायुतीमधून राष्ट्रवादीत गेल्यानं महायुतीला लोकसभा निवडणुकांतही मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. आता संजय कोकाटे यांनी थेट महायुतीच्या विरोधातच उमेदवारी दाखल करताना शपथपत्राद्वारे मतदारांशी संवाद साधायला सुरुवात केल्यानं राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बनदादा शिंदे यांच्या अडचणी वाढणार आहेत.
अधिक पाहा..