देशाला आंतरराष्ट्रीय पदके मिळवून दिली, आता दिव्यांग खेळाडू फुटपाथवर विकतोय चहा; पण का आली अशी वेळ?

Nagpur News नागपूर : जगभरात पॅरिस ऑलम्पिक 2024 (Paris Olympics 2024) चा माहोल असून तमाम देशवासीयांच्या नजरा आपल्या भारतीय खेळाडूकडे लागल्या आहेत.  भारतीय खेळाडू देखील पुन्हा एकदा ऑलिम्पिकमध्ये पदकांची कमाई करण्यासाठी सज्ज झाले आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे 117 खेळाडू सहभागी झाले आहेत. मात्र, कुस्तीपटू विनेश फोगाटला (Vinesh Phogat) सामन्यापूर्वीच अपात्र ठरवल्याने देशभरात एक निराशा पसरल्याचे बघायला मिळाले. त्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण देशभरासह संसदेत देखील उमटताना दिसलेत.

असे असताना कधी काळी देशाला आंतरराष्ट्रीय पदके मिळवून देणाऱ्या एका तिरंदाज खेळाडूंनं  (Para Archery Player) आपली कैफियत मांडली असून आज याच दिव्यांग खेळाडूंवर चहा (Tea) विकून आपला गुजराण करण्याची वेळ आलीय. दिव्यंगत्व आपल्या स्वप्नाच्या आड येऊ शकतं नाही याचं मूर्तिमंत उदाहरण नागपुरातील या खेळाडूंनं घालून दिलंय. मात्र देशाला जागतिक स्तरावर अनेक पदके मिळवून देणाऱ्या या दिव्यांग खेळाडूची शासन दरबारी अवहेलनाच झाली असल्याची खंत आज या खेळाडूंनं मांडली आहे.

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तब्बल 4 वेळा भारताचं प्रतिनिधित्व   

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ज्यांनी तब्बल 4 वेळा भारताचं प्रतिनिधित्व करत देशासाठी पदकं जिंकली त्या नागपूरच्या तिरंदाज संदीप गवई यांची ही कहाणी. संदीप गवई हे पॅरा आर्चरी या क्रीडा प्रकारातील खेळाडू आहे. ते  एका पायाने दिव्यांग असून त्यांना पोलिओ झाला होता. त्यात त्यांना 42% दिव्यांग आले आहे. गेल्या 14-15 वर्षापासून त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये भारतचे प्रतिनिधित्व केले आहे.

यामध्ये चार आंतरराष्ट्रीय स्पर्धांसह राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये 18 हून अधिक पदके त्यांनी पटकावली आहेत. तसेच शासनाच्या वतीने दिला जाणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारही संदीप यांना मिळाला आहे. मात्र, सरकारच्या खेळाडूंप्रती असलेल्या उदासीन वृत्तीमुळे या जागतिक किर्तीच्या खेळाडूवर रस्त्यावर चहा पोहे विकून आपला उदर निर्वाह करण्याची दुर्दैवी वेळ आज आली आहे.

आर्थिक बाजू ठरली स्वप्नांसाठी बाधा

दिव्यंगत्व आपल्या स्वप्नाच्या आड येऊ शकतं नाही, किंबहुना मी माझ्या मेहनतीच्या आणि स्वाभिमानाच्या बळावर आपल्या देशाचे नाव  तिरंदाजी या खेळात उंचावू शकतो, असा आत्मविश्वास संदीप गवई यांना आहे. त्यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण मेहनत आणि कष्टाची परिसीमा गाठली. अनेकदा देश आणि जागतिक स्तरावर यशही मिळवलं. मात्र, तिरंदाजी हा खेळ खर्चीक आणि त्यातल्या त्यात दिव्यंगत्व असल्याने घरच्या जेमतेम परिस्थिति मध्ये या खेळासाठी लागणारी आर्थिक बाजू संदीप यांच्या स्वप्नांसाठी बाधा ठरत होती. अनेक दा त्यांनी या समस्येवर मातही केली मात्र त्यात पुढे फार यश आले नाही. 

शासन दरबारी उपेक्षा, म्हणून कठोर निर्णय 

त्यातच 2018 साली शासनाच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवणाऱ्या सामान्य व दिव्यांग खेळाडूंना नोकरी संदर्भात आश्वासन देण्यात आलं होतं. त्यासाठी खेळाडूंची यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली होती. कालांतराने कागदा पत्रांची पडताळणी प्रक्रिया देखील पूर्ण झाली होती. मात्र आज या संपूर्ण प्रक्रियेला चक्क 7 वर्षाच्या कालावधी लोटला असून  यात कुठलीही प्रक्रिया पुढे सरकली नाही. शासन दरबारी या बाबत वेळो वेळी पाठपुरावा केला. मात्र अद्याप त्यावर कुठलाही तोडगा निघाला नाही. शासनाने आज अनेक योजना आणि आश्वासनांच्या घोषणा केल्या आहेत.

मात्र खऱ्या अर्थाने आमच्यासारख्या दिव्यांग खेळाडूला प्रोत्साहन दिले तर आम्ही देखील देशासाठी काही तरी करून दाखवण्याचे स्वप्न पूर्ण करू. आज परिस्थिती आणि कौटुंबिक जबाबदारी मुळे आज खेळ बाजूला पडला असून सर्वत्र लक्ष कुटुंबाचा उदारनिर्वाह करण्याकडे आहे. परिणामी, माझं स्वप्न आज माझ्यापासून अजून लांब जात असल्याची वेदना संदीप यांनी बोलतांना व्यक्त केले आहे.  

हे ही वाचा 

अधिक पाहा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *