बदलापूरच्या शाळेतील अत्याचार दडपण्याचा प्रयत्न करणारे लोक भाजपचे; उद्धव ठाकरे यांचा थेट आरोप
Uddhav Thackeray On Badlapur Case : बदलापूर : बदलापुरात दोन निरागस चिमुकल्यांवर एका नराधमानं अत्याचार केला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संपूर्ण बदलापूर शहरात बंदची हाक देण्यात आली होती. सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सर्व आंदोलक शाळेबाहेर एकत्र जमले आणि आंदोलनाला सुरुवात झाली. आक्रमक आंदोलकांनी बदलापूर रेल्वेस्थानकात जाऊन रेलरोको सुरू केला. मध्य रेल्वेवरील कल्याण-कर्जत आणि अंबरनाथवरून बदलापूरकडे जाणाऱ्या अप आणि डाऊन दोन्ही मार्गाच्या रेल्वे सेवा पूर्णपणे बंद असून यामुळे कामावर जाणाऱ्यांचे हाल झाले खरे, पण आंदोलकांचं रौंद्ररुप अनुभवायला मिळालं. याच प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गंभीर आरोप केला आहे. बदलापूरच्या शाळेतील अत्याचार दडपण्याचा प्रयत्न करणारे लोक भाजपचे असल्याचा थेट आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की, देशाच्या अनेक भागांत अशा दुर्दैवी घटना वारंवार घडत आहेत. मात्र, काही राज्यात अशा घटना घडल्या तर त्याचा राजकारणासाठी वापर केला जातो, असा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. मला वाटतं की, आपण आपल्या लाडक्या बहिणींसाठी योजना राबवतोच, पण त्याचबरोबर त्यांच्या मुलींच्या सुरक्षेकडेही लक्ष दिलं पाहिजे. आपण फक्त काही राज्यांनाच टार्गेट करून चालणार नाही, तर देशाच्या प्रत्येक भागांत आपल्या मुलींचं रक्षण केलं पाहिजे आणि आरोपींवर त्वरित फास्ट ट्रॅक कोर्टात कठोर कायदे करून कारवाई झाली पाहिजे. तसेच, बदलापूरची शाळा भाजपच्या कोणत्या तरी कार्यकर्त्यांची असल्याचं मला समजलं. मात्र, त्यात राजकारण आणण्याचा माझा हेतू नाही. थोरात कोणत्याही पक्षाचे असोत त्यांना कायद्याच्या कक्षेत आणलंच पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
पोर्शे अपघातातील आरोपीप्रमाणे या नराधमालाही निबंध लिहायला सांगणार का? : उद्धव ठाकरे
“वरळीतील हिट अँड रन आरोपी मिहीर शाह अटकेत आहे. त्यांनी पुणे पोर्शे प्रकरणातील आरोपीला निबंध लिहायला सांगितला असावा. त्याचप्रमाणे ते या नराधमाला निबंध लिहून सोडायला सांगणार आहेत का? कठोर कारवाई व्हायला हवी आणि न्याय प्रलंबित प्रक्रियेत अशी प्रकरणं गायब होणं परवडणारं नाही. तेव्हाच आपण म्हणू शकतो की, आपल्या लाडकी बहन आणि मुलींबद्दल आपल्याला आदर आहे.”, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
दिल्लीत काही वर्षांपूर्वी निर्भया प्रकरण घडलं होतं. या नराधमाला फासावर लटकवायला इतका वेळ लागला. अशा जघन्य प्रकरणांमध्ये न्याय प्रक्रियेला विलंब करणाऱ्यांना जबाबदार धरायला हवं. हाथरस, उन्नव, राजस्थान किंवा आता बदलापूरमध्येही प्रत्येक रेपिस्टला फाशी झाली पाहिजे आणि आमच्या मुलींना संरक्षण मिळाले पाहिजे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
आम्ही आमच्या कार्यकाळात शक्ती विधेयक आणणार होतो. विधेयकाचा मसुदा तयार होता. त्यावेळी विधानसभेचे अधिवेशन कोरोनामुळे दोन ते तीन दिवसांचं झालं होतं. त्यामुळे आमचं सरकार गद्दारांनी पाडलं म्हणून आम्ही हे विधेयक आणू शकलो नाही. आता त्यांनी हे विधेयक रखडवलं आहे. हे विधेयक मांडून या नराधमांना शक्ती विधेयकाची खरी शक्ती दाखवून देण्याची जबाबदारी त्यांची आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
अधिक पाहा..