Ahmednagar News : लोणीत नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाची पथके दाखल, 10 दिवसांत दोन मुलांचा बिबट्याच्या हल्यात मृत्यू

अहमदनगर : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील लोणी गावामध्ये मागील दहा दिवसांत बिबट्याच्या (Leopard) हल्ल्यामध्ये दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचे हे लोणी गाव असून मागील काही दिवसांपासून लोणी गावामध्ये बिबट्याचा मुक्त संचार सुरु आहे. त्यामुळे अनेक वाड्या आणि वस्त्यांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत झालेल्या मुलाच्या कुटुंबियांची भेट महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली. तसेच त्यांचे सांत्वन करत बिबट्याला पकडण्यासाठी विशेष सूचना देखील देण्यात आल्या आहेत. 

या बिबट्यामुळे परिसरात मागील काही दिवसांपासून दहशत पसरली असल्याचं चित्र आहे. त्याचसाठी या बिबट्याला जेरबंद करण्यात यावे यासाठी वनविभागाची पथके दाखल झाली आहेत. त्यामुळे आता हा बिबट्या कधीपर्यंत जेरबंद होणार हाच प्रश्न इथल्या नागरिकांना पडलाय. तसेच या बिबट्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण देखील असल्याने लवकरात लवकर हा बिबट्या जेरबंद व्हावा अशी मागणी गावकरी करत आहेत. 

बिबट्याच्या हल्ल्यात दोन मुलाचा मृत्यू

लोणी गावातील 15 वर्षाच्या मुलाचा 15 जानेवारी रोजी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यानंतर 2 दिवसांपूर्वी लोणी जवळीलच सादतपूर येथील एका मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या दोन्ही कुटुंबाची महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेतली. तसेच त्यांनी परिसरात सुरु असलेल्या शोध पथकांबरोबर चर्चा देखील केली. राज्यातून दोन पथके सध्या लोणी गावात दाखल झाली आहेत. तसेच श्वान पथकांच्या माध्यमातून आणि ड्रोनच्या सहाय्याने या बिबट्याचा शोध सध्या सुरु आहे.

नगर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये वाढ

नगर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्यामध्ये वाढ होत चालल्याचं चित्र आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यासाठी स्वतंत्र रेस्क्यू टीम तयार करण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून निधी  देण्यात आलाय. तसेच ही टीम तयार करण्याचा प्रस्ताव पाठवण्याचा आदेश देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय. बिबट्याचा संचार असलेल्या भागामध्ये शेतीच्या कामासाठी रात्रीच्या ऐवजी दिवास वीज देता येईल का याविषयी देखील प्रस्ताव महावितरणाकडे पाठवण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.

या नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी लोणी गाव आणि परिसरात जवळपास 16 पिंजरे लावण्यात आले आहेत. तसेच नाशिक आणि पुणे येथून आलेल्या रेस्क्यू टीम श्वान पथकाच्या ड्रोनच्या माध्यमातून या बिबट्याचा शोध सध्या सुरु आहे. 

ही बातमी वाचा : 

I.N.D.I.A Alliance: इंडिया आघाडीचा प्रवास खडतर! अखिलेश यादवांनी दाखवला हिरवा कंदील, ममता बॅनर्जींनी बदलली भूमिका, बिहारमध्ये नितीश कुमारांमुळे संकट

अधिक पाहा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *