Ajit Pawar : आम्हीही मराठीच, मग पक्ष पळवायचा प्रश्न येतो तरी कुठे, अजित पवारांचे सुप्रिया सुळेंना उत्तर
मुंबई : आज राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह, नाव आणि झेंडा आम्हाला देण्यात आलं आहे, या निर्णयाचा मी विनम्रपणे स्विकारतो तसेच निवडणूक आयोगाचे देखील आभार मानतो, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी (Ajit Pawar) दिली. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी या निकालवर प्रतिक्रिया देताना मराठी माणसाचा पक्ष पळवला असं म्हटलं. यावर आम्हीही मराठीच मग पक्ष पळवायचा प्रश्न यतो तरी कुठे असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केलाय. आमच्या बाजूने निकाल लागल्यामुळे ते सर्वोच्च न्यायालयात जाण्याची भाषा करतायत, असंही अजित पवारांनी म्हटलं.
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांकडे निवडणूक आयोगनाने दिले आहे. त्यामुळे आता शरद पवारांच्या हातून राष्ट्रवादी पक्ष गेला असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. अवघ्या काही दिवसांवर लोकसभा निवडणुका आल्या आहेत. तर पुढील काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचा हा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणाला आणखी एक नवं वळण देणार असल्याचं म्हटलं जात आहे.
निवडणूक आयोगाने आमची बाजू खरी मानली – अजित पवार
निवडणूक आयोगाने योग्य चाचपणी करुन हा निर्णय दिलाय. आमची बाजू त्यांनी खरी मानली.आमच्यासोबत किती ताकद आता आहे, हे देखील स्पष्ट झालं आहे. त्यामुळे यावर कोण काय बोलतं याकडे लक्ष देणार नाही. कोण काय बोललं यावर बोलायला मी बांधिल नाही, असंही अजित पवारांनी म्हटलं.
ज्यांनी हा पक्ष स्थापन केला, त्यांच्या हातून तो पक्ष काढून घेणं हे पहिल्यांदाच देशाच्या इतिहासात झालं असावं. हे महाराष्ट्राच्या विरोधात मोठं षडयंत्र आहे. शिवसेना हा बाळासाहेब ठाकरेंचा मराठी माणसांचा पक्ष, राष्ट्रवादी हा शरद पवारांचा मराठी माणसाचा पक्ष, त्यामुळे मराठी माणसाच्या विरोधात, महाराष्ट्राच्या विरोधात अदृश्य शक्ती जे काही निर्णय घेत असते, त्यातलाच हा एक निर्णय, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे दिल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीये. अजित पवारांनी ट्वीट करत ही प्रतिक्रिया दिलीये. निवडणूक आयोगाचा निर्णय आम्ही विनम्रपणे स्विकारतो, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीमध्ये बंड केल्यानंतर अजित पवारांची त्यांनी सत्ताधारी पक्षांसोबत जाण्याची भूमिका घेतली. त्यानंतर त्यांच्याकडून राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर देखील दावा करण्यात आला होता. निवडणूक आयोगात राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची लढाई सुरु होती. पण आता अजित पवारांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत करत स्वत:चा राष्ट्रीय अध्यक्ष असा उल्लेख देखील केला आहे.
[embedded content]
ही बातमी वाचा :
अधिक पाहा..