Dhananjay Munde : स्व. गोपीनाथराव मुंडे योजनेतून शेतकऱ्यांना 23 कोटी 37 लाख निधी वितरित: धनंजय मुंडे
मुंबई : स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेत रूपांतर केल्यानंतर प्रथमच कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या माध्यमातून या योजनेतील लाभार्थींना वितरित करण्यासाठी 23 कोटी 37 लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
पूर्वी सदर योजना ही स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे अपघात विमा योजना या नावाने ओळखली जायची. या अंतर्गत विमा सुरक्षा म्हणून अपघातग्रस्त शेतकऱ्यांना अपघातातील उपचारासाठी किंवा मृत्यू पश्चात त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य म्हणून ठराविक रक्कम देण्यात येत होती. मात्र धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून महायुती सरकारच्या काळात या योजनेचे विमा योजनेतून सानुग्रह अनुदान योजनेत रूपांतरण करण्यात आले.
यादरम्यानच्या खंडित कालावधीतील अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना काही दिवसापूर्वीच धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून तब्बल 49 कोटी रुपये इतक्या लाभाचे वितरण करण्यात आले होते. त्यानंतर आता योजना नव्या रूपाने सुरू झाल्यापासूनच्या काळातील प्रलंबित प्रकरणे निकाली लावून त्यांच्या कुटुंबीयांना लाभाचे वितरण करण्यासाठी 23 कोटी 37 लाख इतका निधी आज उपलब्ध करुन देण्यात आलाय.
जनता दरबारातील निवेदन अन् शेतकऱ्यांना लाभ
दरम्यान, सदर योजनेतील खंडित कालावधीत अपघात होऊन मृत्यू पावलेल्या परभणी जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या कुटुंबियांनी काही दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांची परळी येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात जनता दरबार उपक्रमातंर्गत भेट घेऊन निधी अभावी लाभ मिळाला नसल्याबाबत विनंती केली होती. त्यांनंतर धनंजय मुंडे यांनी या योजनेचा संपूर्ण आढावा घेऊन खंडित कालावधीतील राज्यातील सर्व प्रकरणे निकाली काढत त्यासाठी 49 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला. त्याचबरोबर बदललेल्या योजनेतील 23 कोटी रुपये अनुदान देखील उपलब्ध करून दिले आहे.
कृषी विभागाच्या पुरस्काराच्या रकमेत चौपट वाढ
राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेती क्षेत्राशी संबंधित उल्लेखनीय कार्याकरिता देण्यात येणाऱ्या विविध पुरस्करांच्या रकमेत चौपट वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
कृषीमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, शेती व शेतीपूरक क्षेत्रामध्ये अतिउल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास अथवा संस्थेस कृषी विभागामार्फत दरवर्षी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी वेळोवेळी कृषी पुरस्कारांच्या रकमेत वाढ करण्याची घोषणा ठिकठिकाणी केली होती. या घोषणेची पूर्तता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने आज करण्यात आली आहे. पुरस्कारांची संख्या आणि पुरस्कार विजेत्यांचा भत्ता सुद्धा वाढविण्यात आला आहे.
ही बातमी वाचा :
अधिक पाहा..