Kolhapur : मराठा आरक्षणाचा लढा सुरु असतानाच हातकणंगल्यात मराठा मंदिर साकार; राजकीय देणगी नाकारून स्वप्न सत्यात

कोल्हापूर: मनोज जरांगे यांनी केलेल्या संघर्षानंतर, आरक्षणाच्या (Maratha Reservation Protest) मागण्या मान्य झाल्यानंतर एकीकडे राजकीय नेत्यांनी आता त्याचं श्रेय घेण्यासाठी पुढाकार घेतल्याचं दिसतंय, तर दुसरीकडे कोल्हापुरातील हातकणंगल्यात मात्र राजकारणविरहित मराठा मंदिराची (Hatkanangale Maratha Mandir) उभारणी करण्यात आली आहे. कोणत्याही राजकीय नेत्याची मदत न घेता तब्बल 23 वर्षांनी मराठा मंदिरांचं स्वप्न साकार झाल्यानंतर मात्र गावकऱ्यांचा आनंद गगणात मावेनासा झाल्याचं दिसतंय. सोमवारी (29 जानेवारी) त्यावर कळस चढला आणि गावातील महिला भगिणींनी एखाद्या सणाप्रमाणे, अलोट गर्दीने हळदी-कुंकूचा कार्यक्रम पार पाडला. या कार्यक्रमासाठी हजारो महिला एकत्र जमल्या होत्या. 

कोणतीही राजकीय देणगी वा फंड नाकारून उभं करण्यात आलेल्या मंदिरामुळे गावकऱ्यांचं मात्र जिल्ह्यातील सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. 

11 रुपयांपासून देणगी घेतली

हातकणंगले हे तालुक्याचं गाव असून मराठा आरक्षण असो वा समाजाशी निगडीत इतर आंदोलन असो, हे गाव नेहमीच त्यामध्ये अग्रेसर राहिलंय. या गावात मराठा समाज मंदिर उभारण्याचं काम सुमारे 23 वर्षांपूर्वी म्हणजे, 2001 साली सुरू झालं. मराठा मंदिराची उभारणी करताना सुरुवातीची अट होती ती म्हणजे कोणत्याही राजकारणी नेत्याकडून देणगी घ्यायची नाही, कोणताही सरकारी फंड घ्यायचा नाही. समाजातील लोकांकडूनच 11 रुपयांपासून देणगी घ्यायला सुरूवात झाली. त्यानंतर 2002 साली या मंदिराची पायाभरणी झाली.

गावातील नागरिकांच्या हस्ते मराठा मंदिराचं उद्घाटन

मधल्या काळात मराठा मंदिराच्या उभारणीचं काम काहीसं थंडावलं. पण मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन सुरू झाल्यावर पुन्हा एकदा या कामाने जोर घेतला. पाचतिकटी भागात टोलेजंग इमारतीची उभारणी झाल्यानंतर 8 जानेवारी रोजी, कोणत्याही राजकीय नेत्याला न बोलावता समाजातील नागरिकांच्या हस्तेच या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर 12 जानेवारी रोजी, जिजाऊ जयंतीनिमित्ताने महाप्रसाद ठेवण्यात आला. 

महिलांची गर्दीच गर्दी, प्रमुख पाहुण्याविना कार्यक्रम पार

मराठा मंदिराच्या उद्घाटनानंतर सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे महिलांच्या मेळाव्याच्या आणि हळदी-कुंकुवाचा कार्यक्रम घेण्याचं ठरवलं. हा कार्यक्रमही राजकारणविरहित करण्यासाठी राजघराण्यातील संयोगिताराजे छत्रपती यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी गावातल्या हजारो महिला एकत्रित झाल्या होत्या. मात्र संयोगिताराजे छत्रपतींनी ऐनवेळी कार्यक्रमास उपस्थित राहू शकणार नाही असा निरोप पाठवला.

प्रमुख पाहुण्या न आल्याने गावातील महिलांनी मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पाडला. गावभर फटाके वाजवण्यात आले, ढोल-ताशांच्या साथीनं फेरी काढण्यात आली. सर्वसामान्य मराठा समाजातील महिला आणि मुलींनी ‘जय जिजाऊ, जय शिवराय’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. तसेच गावातील प्रमुख महिलांनी यावेळी मार्गदर्शन केलं. 

23 वर्षांनंतर मराठा मंदिराचं स्वप्न साकार

हातकणंगल्यामध्ये गेल्या 23 वर्षांनंतर मराठा समाजाचं स्वप्न साकार झालं आहे. त्यासाठी मराठा समाजाचे अध्यक्ष दयासागर मोरे, पंडित निंबाळकर, सुभाष चव्हाण, सागर लुगडे, प्रकाश मोरे, संतोष मोरे, संदीप पोवार, प्रवीण कदम आणि राजेंद्र वाडकर यांच्यासह अनेक नागरिकांनी प्रयत्न केले.

हातकणंगल्यात मराठा समाजाच्या वतीने दरवर्षी विद्यार्थी, महिला, आर्थिक दुर्बल घटकांसाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात, वेगगवेळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात, वेगगवेळ्या योजनांची माहिती देण्यासाठी कार्यक्रम आखले जातात. आता या सर्व कार्यक्रमांसाठी एक हक्काची जागा मिळाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *