Rashid Sheikh Passed Away : माजी आमदार रशीद शेख यांचं निधन; हसतमुख, अभ्यासू व्यक्तिमत्त्व हरपलं
Former MLA Rashid Sheikh Passed Away : मालेगावचे (Malegaon) माजी आमदार रशीद शेख (Rashid Sheikh) यांचं निधन झालं आहे. रशीद शेख यांचं निधन झाल्याने दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. नाशिकच्या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आयेशा नगर कब्रस्तान येथे आज सकाळी 11 वाजता त्यांचा दफन विधी होणार आहे. हसतमुख, अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून माजी आमदार शेख रशीद यांची ओळख होती. रशीद शेख मालेगाव मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिले होते. 25 वर्ष तत्कालीन आमदार राहिलेले स्व. निहाल अहमद यांचा त्यांनी पराभव केला होता. मालेगाव महानगर पालिकेचे महापौर पदाची धुरा देखील त्यांनी सांभाळलेली होती.
रशीद शेख यांचं वयाच्या 65 व्या वर्षी निधन
सोमवारी 4 डिसेंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 65 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. अलिकडेच त्यांच्यावर हृदयविकाराची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी त्यांना मालेगावच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. पण, त्यांची तब्येत बिघडली. त्रास वाढल्यामुळे त्यांना नंतर नाशिकच्या खासगी रुग्णालयात हलवलण्यात आलं होतं. त्यानंतर सोमवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
रशीद शेख यांची कारकिर्द
हसतमुख, अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. मालेगाव मतदार संघाचे दोन वेळा ते आमदार राहिले होते. 1999 मध्ये रशीद शेख यांनी मालेगावमधून 25 वर्षांहून अधिक काळ आमदार राहिलेल्या निहाल अहमद यांचा पराभव केला होता. त्यांनी अलिकडेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्याआधी ते काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष होते. रशीद शेख 2017 मध्ये ते पुन्हा नगरसेवक झाले. त्याआधी 1994 मध्ये नगराध्यक्ष होते. ते तीन वेळा नगरसेवक म्हणूनही निवडून आले होते. काँग्रेस सरकारच्या काळात त्यांनी राज्यमंत्री पद दर्जाचे महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती.