Vishali Yatra : सीमाभागातील कुन्नूर गावच्या विशाळी यात्रेच्या 100 व्या वर्षाला प्रारंभ, श्री संगमेश्वराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी
Kunnur Vishali Yatra : कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या, दुधगंगा-वेदगंगा या पवित्र नद्याच्या संगमावर वसलेल्या निपाणी तालुक्यातील कुन्नूर या गावच्या 100 व्या विशाल तीर्थ यात्रेला (Kunnur Vishali Yatra) आजपासून प्रारंभ झाला. त्यानिमित्ताने सीमाभागातल्या नागरिकांची श्री संगमेश्वरच्या दर्शनासाठी मोठी रिघ लागल्याचं दिसतंय. यात्रेचं यंदाचं शतकमहोत्सवी वर्ष असल्याने गावकऱ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला आहे. गावोगावीची यात्रा जत्रा संस्कृती लुप्त होत असतानाही कुन्नूर गावाने ही संस्कृती अजूनही जपलीय आणि वाढवलीय हे विशेष.
बेळगाव जिल्ह्यातील कुन्नूर हे कोल्हापुरातील हातकणंगले आणि कागल तालुक्याना खेटून असलेलं गाव. या गावाला मोठा धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. दूधगंगा आणि वेदगंगा या नद्यांच्या उत्तरवाहिनी संगमावर वसलेल्या या गावामध्ये अनेक साधूसंत आणि ऋषींनी वास्तव्य केलं आहे. श्री मार्कंडेय ऋषींनी याच गावात तपश्चर्या केल्याने या ठिकाणाला एक वेगळंच धार्मिक महत्त्व आहे. हे गाव मार्कंडेय ऋषीमुनींची तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे.
पाच दिवसांच्या यात्रेला सुरूवात (Kunnur Vishal Tirth Yatra)
पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेच्या पहिल्या दिवशी ग्रामदैवत हनुमान आणि इतर देवांच्या पालख्या नदीच्या संगमावर नेल्या जातात. त्या ठिकाणी गावकामगार पोलीस पाटील आणि इतर मानकऱ्यांच्या हस्ते श्री संगमेश्वराला जलाभिषेक केला जातो. त्यानंतर महानैवेद्य दाखवून यात्रेला सुरुवात होते.
यात्रेचं शंभरावं वर्ष (Kunnur Vishali Yatra 100 Years)
कुन्नूर गावचे गावकामगार पोलीस पाटील कै. भाऊसाहेब उर्फ दत्ताजीराव केदारराव जाधव यांनी 1924 साली या पाच दिवसांच्या यात्रेची सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीला स्वतःच्या शेतातील चारा देऊन या ठिकाणी जनावरांचा बाजार भरवला. त्यानंतर कै. बाळासाहेब दत्ताजीराव जाधव यांच्या काळात या यात्रेला विशाल स्वरूप प्राप्त झाले.
जातिवंत बैलांचा बाजार
महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, कर्नाटकातील बेळगाव, धारवाड आणि गोव्यातील भाविक या यात्रेच्या निमित्ताने संगमेश्वराचे दर्शन घेण्यासाठी येतात. तसेच या यात्रेच्या ठिकाणी जातिवंत बैलांचा बाजार भरतो. गेल्या शंभर वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा आजही कायम आहे. तसेच या ठिकाणी मोठमोठे पाळणे, मिठाईची दुकाने आणि वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा मेळा भरतो. गावकामगार पोलीस पाटील परिवार आणि यात्रा कमिटी यांच्यामार्फत या यात्रेचे चोख नियोजन केले जाते.
कुन्नूरच्या या यात्रेला कोल्हापूरहून जायचं असेल तर कागलवरून जाता येतं. तसेच हातकणंगले तालुक्यातील हुपरी या ठिकाणाहूनही कुन्नूरच्या यात्रेला जाता येतं.
अधिक पाहा..