Navneet Rana : शरद पवारांच्या मनात भाजप, त्यांचा आशीर्वाद घेऊनच नवनीत राणा भाजपमध्ये गेल्या; रवी राणांचा खळबळजनक दावा

अमरावती : शरद पवार यांचे आशीर्वाद घेऊनच नवनीत राणा या (Navneet Rana) भाजपमध्ये गेल्याचा खळबळजनक दावा आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केला आहे. नवनीत राणांनी भाजपसोबत जावं ही शरद पवारांची इच्छा होती, त्यांनीच अजित पवारांना भाजपमध्ये पाठवलं असा  दावाही रवी राणा यांनी केला आहे. शरद पवारांनी केलेल्या टीकेनंतर रवी राणांनी हा दावा केला. 

शरद पवारांच्या आशीर्वादामुळे नवनीत राणा भाजपमध्ये

आमदार रवी राणा म्हणाले की, मागच्या निवडणुकीत पवार साहेबांनी नवनीत राणांना पाठिंबा दिला होता, ते प्रचार करायला आले. शरद पवारांच्या आशीर्वादामुळेच नवनीत राणा खासदार झाल्या. आता शरद पवारांचा आशीर्वाद घेऊनच नवनीत राणा या भाजपमध्ये गेल्या. शरद पवारांची इच्छा होती म्हणूनच अजित पवारांनाही त्यांनी भाजपमध्ये पाठवलं.

शरद पवारांच्या मनामध्ये भाजप

काँग्रेसच्या दबावामुळे आणि उद्धव ठाकरेंच्या दबावामुळे आज ते भाजपच्या विरोधात बोलले असतील. पण शरद पवारांच्या मनामध्ये भाजप आहे, फक्त ओठावर विरोध आहे. शरद पवार साहेबांच्या मनामधील भाजपमध्येच नवनीत राणा आहे. फक्त सुप्रिया सुळे यांच्या हट्टामुळे त्यांना भाजपसोबत जाता येत नाही. 

नवनीत राणांना खासदार करणे ही चूक, शरद पवारांची जाहीर कबुली

अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा घेण्यात आली. या सभेत शरद पवार यांनी अमरावतीकरांची जाहीर माफी मागितली. मागच्या वेळी एक चूक माझ्याकडून झाली अन् नवनीत राणा यांना पाठिंबा दिला. आता ती चूक कधी होणार नाही, हे सांगायला मी आलो आहे असं शरद पवार यांनी आपल्या भाषणात म्हटलं. 

उद्धव ठाकरेंचं खोटं हिंदुत्व उघडं पडलं

संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना आमदार रवी राणा म्हणाले की, “संजय राऊत हे नाचोळे आहेत, काँग्रेसच्या आणि सोनिया गांधीच्या दरबारात ते नाचतात. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी भाजपसोबत बेईमानी केली. अमरावतीमध्ये हिंदुत्वाला डिवचण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहे. उद्धव ठाकरेंचं खोट हिंदुत्व उघडं पडलं आहे.”

बच्चू कडू हे मीडियाप्रेमी

आमदार बच्चू कडूंवर टीका करताना रवी राणा म्हणाले की, “बच्चू कडू हे मीडिया प्रेमी आहेत. मीडियामध्ये चर्चेत राहण्याची त्यांना सवय आहे. मोठ्या माणसाला विरोध करायचा आणि टीआरपी मिळवायचं हे त्यांचं काम आहे. सभेच्या मैदानासाठी आम्ही परवानगी मागितली, सर्व परवानगी आमच्याजवळ आहे.”

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *